रणजितसिंह डिसले ग्लोबल पुरस्कार विजेते

💐 शिक्षक 💐

शिक्षक म्हणजे ,

चांगले संस्कार करणारी मूर्ती 

संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती 

चारित्र्यवान विद्यार्थी घडवणारा शिल्पकार.

जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार 





 रणजितसिंह डिसले सर 

रणजितसिंह डिसले सर हे महाराष्ट्रातील एक शिक्षक आहेत.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवडीच्या जिल्हा परिषद शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. 
     रणजितसिंह डीसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे विद्यालयात झाले. ते २००९ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यु आर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले सर प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे;तसेच इतर शिक्षकांनाही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले आहे. आय टी च्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन मध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले.                            

ग्लोबल टीचर पुरस्कार 

३ डिसेंबर २०२० रोजी ,युनेस्को व लंडनस्थित वार्कि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रणजितसिंह डीसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम १मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे.हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.

या आधी डिसले सर यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशन चा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे,अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.

             QR कोड च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशातील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला तेंव्हा, रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग केला जातो, याविषयी सांगितले.

सात कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल ,असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकाची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले .

अभिमान वाटतो शिक्षक असल्याचा !



Comments

Post a Comment